कोलकाता - भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळा़डू रवींद्र जडेजा रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी खेळू शकणार नाही. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एससीए) मागणीला नकार दिला आहे. त्यामुळे ९ मार्चला सुरू होणाऱ्या पश्चिम बंगालविरुद्धच्या अंतिम सामन्यात जडेजाला खेळता येणार नाही.
हेही वाचा -भारताच्या कर्णधाराचा 'हा' व्हिडिओ सोशल मीडियावर ठरतोय तुफान हिट!
'रणजीपेक्षा देश आधी', असे गांगुलीने एससीएला कळवले आहे. १२ मार्चपासून भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळायची आहे. त्यामुळे जडेजाला सौराष्ट्रकडून खेळण्याची मान्यता मिळू शकली नाही. पश्चिम बंगालने १३ वर्षांनंतर रणजी करंडक अंतिम फेरी गाठली आहे. त्याचबरोबर सौराष्ट्रने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
'मी बीसीसीआयच्या अध्यक्षांना जडेजाला रणजीचा अंतिम सामन्यात खेळण्यास परवानगी देण्यास सांगितले, परंतु त्यांनी नकार दिला', असे एससीएचे अध्यक्ष जयदेव शहा यांनी म्हटले आहे.
आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत जडेजा हा भारतीय संघाचा भाग आहे, ज्यामुळे त्याला सोडण्यात आलेले नाही. राजकोट येथील त्यांच्या घरच्या मैदानावर सौराष्ट्र बंगालविरुद्ध विजेतेपदाचा सामना खेळणार आहे.