पुणे -गहुंजे मैदानावर आफ्रिकेविरुद्ध खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने एक डाव आणि १३७ धावांनी विजय मिळवला आहे. चौथ्या दिवशी आफ्रिकेचा संघ फॉलो-ऑनच्या संकटातून बाहेर पडू शकला नाही. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या अप्रतिम प्रदर्शनामुळे आफ्रिकेचा दुसरा डाव १८९ धावांवर आटोपला.
या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने दक्षिण आफ्रिकेला फॉलो-ऑन दिल्यानंतर, डीन एल्गार आणि टेंबा बावुमा व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूला साजेशी कामगिरी करता आली नाही. उपाहारापर्यंतच, भारत डावाने विजय मिळवणार हे निश्चित झाले होते. दुसऱ्या डावात आफ्रिकेचा संघ मैदानात उतरल्यानंतर, वेगवान गोलंदाज इशांत शर्माने आफ्रिकेला पहिला धक्का दिला. त्याने षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर सलामीवीर एडन मार्करामला माघारी धाडले. त्यानंतर थेऊनिस ब्रायनही ८ धावांवर माघारी परतला. आफ्रिकेचे २१ धावांवर २ गडी बाद झाले असताना डीन एल्गार संघासाठी धावून आला. त्याने ८ चौकारांसह ४८ धावा केल्या. एल्गारला अश्विनने माघारी धाडले.
आफ्रिकेचा मधल्या फळीतील फलंदाज टेंबा बावुमाने ३८ धावा केल्या. मात्र, दुसऱ्या बाजूला त्याला कोणाचीही साथ मिळाली नाही. क्विंटन डी-कॉकही ५ धावांवर माघारी परतला. मागच्या डावात हिरो ठरलेला केशव महाराजही २२ धावा करून बाद झाला. भारताकडून उमेश यादव आणि जडेजा यांनी प्रत्येकी ३, अश्विनला २ तर इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी १ गडा बाद केले.
काल तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी काही अवधी उरला असताना आफ्रिकेचा संपूर्ण संघ पहिल्या डावात २७५ धावांवर आटोपला. यामुळे भारताला पहिल्या डावात ३२६ धावांची मोठी आघाडी मिळाली होती.