नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात क्रीडाविषयक उपक्रम विविध अटींवर सुरु करण्यात येत आहेत. वेस्ट इंडीजचा संघ मंगळवारी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. पण या दौऱ्यातून डेरेन ब्राव्हो, शिमरोन हेटमायर आणि किमो पॉल या महत्वाच्या तीन खेळाडूंनी माघार घेतली आहे. त्यांनी कौटुंबिक चिंतेमुळे कोरोना महामारीत इंग्लंड दौरा करण्यास नकार दिला आहे. त्यांच्या या निर्णयावर विंडीजचे दिग्गज मायकेल होल्डिंग यांनी मत दिले.
होल्डिंग म्हणाले, "वेस्ट इंडीज क्रिकेटचा विचार करायचा झाला तर, हे मला दुर्दैवी वाटते. कोरोनाच्या काळात त्यांनी इंग्लंडला जावे, असे मी कोणालाही सांगणार नाही. पण हे वेस्ट इंडीज संघाचेही दुर्दैव आहे. कारण हे खेळाडू खूपच प्रतिभावान आहेत आणि संघाला त्यांची गरज भासेल." इंग्लंड मालिका ब्राव्होला पुन्हा रुळावर आणण्यास सक्षम असल्याचा विश्वासही होल्डिंग यांनी व्यक्त केला.