मुंबई- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा जगातील एकमेव खेळाडू आहे. त्याने खोऱ्याने धावा जमवल्या, पण त्याला अनेकदा पंचाच्या चुकीच्या निर्णयाचा त्याला शिकार व्हावे लागले आहे. सामन्यातील अगदी महत्त्वाच्या क्षणी सचिनला अनेकदा वादग्रस्तरीत्या बाद दिले गेल्याच्या घटना क्रिकेटप्रेमींच्या मनात अजूनही ताज्या असतील. सचिनला अशाप्रकारे बाद देणाऱ्या पंचांमध्ये स्टिव्ह बकनर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंच म्हणून निवृत्ती स्वीकारल्यानंतर, बकनर यांनी सचिनला दोनवेळा चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याचे मान्य केले आहे.
स्टिव्ह बकनर एका रेडिओ कार्यक्रमादरम्यान म्हणाले, 'सचिनला मी दोनवेळा चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याचे मला आठवते. कोणत्याही पंचासाठी चुकीचे निर्णय देणे ही चांगली बाब नाही. कुठलाही पंच जाणूनबुजून चुका करत नाही, त्या चुका होतात. त्यामुळे पंचांचे भविष्य उद्ध्वस्त होते. पण चुका या माणसाकडूनच होतात.'