नवी दिल्ली - भारताचा डावखूरा फलंदाज सुरेश रैना याच्या गुडघ्यावर नेदरलंडच्या अॅमस्टरडॅम येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. रैनाच्या या शस्त्रक्रियेनंतर, अनेक चाहत्यांनी त्याला बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांबरोबर, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्षेत्ररक्षक जॉन्टी ऱ्होड्सनेही त्याला 'आराम से मित्रा' म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.
ऱ्होड्सने रैनाला ट्विटरवरुन एक संदेश दिला आहे. 'रैना, तू आधीच्या वर्षात केलेल्या कामगिरीमुळे तू खूप लोकांचे प्रेरणास्थान झाला आहेस. माझ्या मित्रा, आता शरीराचे ऐक. मी तूला ओळखतो, उद्यापासून तू सरावाला उतरशील.' असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ट्विट करुन रैनाच्या दुखापतीची माहिती दिली होती. मागील काही महिन्यांपासून रैनाला गुडघेदुखीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. रैनावर पार पडलेल्या शस्त्रक्रियेनंतर त्याला ४ ते ६ आठवड्यासाठी आराम करावा लागणार आहे.
भारतीय संघाकडून सुरेश रैनाने १८ कसोटी, २२५ एकदिवसीय आणि ७८ टी- २० सामने खेळले आहेत. त्याने १८ कसोटी सामन्यातील ३१ डावांमध्ये खेळताना ७६८ धावा केल्या आहेत. तर २२६ एकदिवसीय सामन्यात त्याने ३५.३१ च्या सरासरीने ५६१५ धावा जमवल्या आहेत. यात ५ शतके आणि ३६ अर्धशतकांचा समावेश आहे. ७८ टी-२० सामन्यात खेळताना १६०४ धावा केल्या असून त्यामध्ये १ शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे.