नवी दिल्ली - क्रीडा विश्वात मानसिक ताण-तणावाबाबत अनेक खेळाडूंनी आपली प्रतिक्रिया दिली. दरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज प्रविण कुमारनेही या गोष्टीबद्दल मत मांडत एक धक्कादायक खुलासा केला आहे. या कारणास्तव मीसुद्धा स्वत:वर गोळी झाडून घेण्याचा विचार करत होतो, असे प्रवीण कुमारने म्हटले आहे.
हेही वाचा -'रोहितने ऑस्ट्रेलिया का मार मार के भरता बना दिया', पाक खेळाडूने केले 'हिटमॅन'चे कौतूक
एका इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रविण कुमारने हा खुलासा केला. 'आत्महत्या करण्याचा विचार केल्यानंतर, गाडीत मी जेव्हा माझ्या मुलाचा फोटो पाहिला तेव्हा मी माझा विचार बदलला', असे प्रविण कुमारने सांगितले. अलीकडेच ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने मानसिक तणावामुळे क्रिकेटपासून विश्रांती घेतली होती. त्यानंतर, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही या गोष्टीबद्दल प्रतिक्रिया दिली. '२०१४ मध्ये मलाही मानसिक ताणतणावाचा सामना करावा लागला, त्यावेळी मी क्रिकेट सोडायचा विचार केला होता', असे विराटने एका पत्रकार परिषदेत म्हटले होते.
१८ नोव्हेंबर २००७ला पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रविण कुमारने २००८ मधील तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात गिलख्रिस्ट आणि पॉन्टिंगला माघारी धाडले होते. या मालिकेच्या चार सामन्यात त्याने १० बळी घेतले. त्यानंतर त्याने आपला हाच फॉर्म कायम ठेवला होता.
२०११ च्या विश्वचषक संघात स्थान मिळवण्याचे प्रविणचे स्वप्न होते, परंतु त्याला या स्पर्धेपूर्वी डेंग्यू झाला. प्रवीण या आजारातून बरा झाला पण त्याने कारकिर्द गमावली. भारतीय संघात स्थान मिळवता न आल्याने तो उत्तर प्रदेशच्या अंडर-२३ संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक झाला. परंतु त्याची कारकिर्द तिथेही फार काळ टिकली नाही. प्रवीणला पुनरागमन करायचे होते. मात्र, २०१८ मध्ये त्याने क्रिकेटच्या सर्व स्वरूपातून निवृत्तीची घोषणा केली.