नवी दिल्ली - माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी १९७५-७६मध्ये घडलेल्या एका घटनेबाबत खुलासा केला आहे. या काळात भारतीय संघ न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर होता. तेव्हा बीसीसीआयकडे पितृत्वाच्या कारणासाठी रजा मागितली नसल्याचे गावसकरांनी सांगितले आहे.
तत्कालित माध्यमांच्या वृत्तानुसार, गावसकर यांनी रजा मागितली. मात्र, बीसीसीआयने त्यांना रजा देण्यास नकार दिला होता, असे सांगितले गेले होते. गावसकर यांनी तब्बल ४५ वर्षानंतर या घटनेबाबत खुलासा केला आहे. ते म्हणाले, "मी रजा मागितली, यात सत्यता आहे, पण कारण योग्य नाही. मी माझ्या पत्नीकडे परत जाण्याची परवानगी मागितली नव्हती. न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज दौर्यावर असताना मला माहित होते की, माझी पत्नी प्रसूत होणार आहे. असे असूनही, मी भारताकडून खेळण्यासाठी वचनबद्ध राहिलो आणि पत्नीने माझ्या निर्णयाचे समर्थन केले."