मुंबई - भारताचे माजी क्रिकेटपटू सदाशिव रावजी पाटील यांचे मंगळवारी वृध्दापकाळाने निधन झाले. पाटील यांनी ८६ व्या वर्षी कोल्हापूरच्या त्यांच्या घरात अखेरचा श्वास घेतला. पाटील यांच्या निधनावर क्रिकेट जगतातील खेळाडूंनी शोक व्यक्त केला आहे. बीसीसीआयने ही ट्विट करत पाटील यांना श्रद्धाजंली वाहिली. भारतीय संघात खेळलेले पाटील हे एकमेव कोल्हापूरचे क्रिकेट खेळाडू होते.
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघाचे माजी पदाधिकारी रमेश पाटील यांनी पीटीआयला सांगितले की, सदाशिव पाटील यांचे कोल्हापूरातील रुईकर कॉलनीमधील घरात निधन झाले. यावर बीसीसीआयने शोक व्यक्त करताना, मध्यम गतीने गोलंदाज करत पाटील यांनी 1952-53 साली महाराष्ट्रासाठी प्रथम श्रेणीमध्ये पदार्पण करत आपली छाप सोडली होती, असे म्हटलं आहे.
सदाशिव पाटील यांनी मुंबईकडून खेळताना एका स्पेलमध्ये गोलंदाजी करताना विरोधी संघाला 112 धावात गुंडाळण्यात महत्वाची भूमिका निभावली होती. याच सामन्यात त्यांनी दुसऱ्या डावात 68 धावात 3 गडी बाद केले. मुंबईने हा सामना 19 धावांनी जिंकला.