मुंबई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला चेन्नईमध्ये ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. उभय संघातील मालिकेत भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. कारण भारतीय संघाने काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात धूळ चारली आहे. आता भारतीय संघ मायदेशात मालिका खेळणार आहे. असे असले तरी, भारतीय संघाने इंग्लंडला कमी लेखण्याची चूक करू नये, असे मत भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज किरण मोरे यांनी व्यक्त केले आहे. इंग्लंडच्या संघात प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत टाकण्याची क्षमता असल्याचे मोरे यांनी म्हटलं आहे.
एका इंग्रजी माध्यमाशी बोलताना किरण मोरे म्हणाले की, 'इंग्लंडचा संघ नेहमीच पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरतो. त्यांच्यात प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत टाकण्याची क्षमता आहे. तसेच त्यांच्याकडे दोन चांगले फिरकीपटू आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील विजयानंतर भारताने इंग्लंडला कमी लेखण्याची चूक करू नये.'
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी कस्सून तयारी केली होती. तसेच योग्य योजना आखल्या होत्या. आता इंग्लंड मालिकेतही भारतीय संघाला पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरणे गरजेचे आहे. कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येक सत्र खूप महत्वाचे असते, असे देखील मोरे म्हणाले.