नवी दिल्ली -सध्या टीम इंडिया विंडीज दौऱ्यावर कसोटी मालिका खेळत आहे. गुरुवारपासून सुरू झालेल्या या पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजी करण्यास उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. या पार्श्वभूमीवर भारताचा माजी फलंदाज वसीम जाफरने या मालिकेसाठी गेलेल्या टीम इंडियाला खुले आव्हान दिले आहे.
जाफरने त्याच्या वेळच्या एका विंडीज मालिकेची आठवण करून देणारा एक फोटो शेअर केला. त्यात त्याने एंटिगामध्ये केलेल्या २१२ धावांच्या खेळीची आठवत करुन दिली. जाफरने अशीच खेळी परत एकदा करण्याचे टीम इंडियाला आव्हान दिले.
जाफरने ट्विटमध्ये म्हटले "२००६च्या एंटिगा कसोटीमध्ये मी २१२ धावा केल्या होत्या आणि त्या खेळीत एक षटकारही ठोकला होता. सध्या एंटिगामध्ये सुरू असलेल्या कसोटीत मी केलेला पराक्रम कोण करु शकणार आहे का?'
सध्या विंडीजमध्ये सुरू असलेल्या कसोटीत भारताने दुसऱ्या दिवशी ७ गड्यांच्या मोबदल्यात २०७ धावा केल्या आहेत. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. २५ धावांच्या आतच भारताने आघाडीचे फलंदाज गमावले. मयंक अग्रवाल ५ धावा तर चेतेश्वर पुजारा केवळ २ धावा करत माघारी परतला. ७ धावांमध्ये दोन खेळाडू गमावल्यानंतर कर्णधार विराट कोहली फलंदाजीसाठी मैदानात आला. मात्र, त्यानेही निराशा केली. कोहली ९ धावा केल्यानंतर शैनन गेब्रियलच्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर केएल राहुल आणि अजिंक्य रहाणे यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन करत भारताचा डाव सांभाळला.