लंडन -नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल इंग्लंडचा माजी फलंदाज केव्हिन पीटरसनचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक केले गेले आहे. ब्रिटीश पत्रकार पियर्स मॉर्गन यांनी शनिवारी ही माहिती दिली.
''ब्रेकिंग. मला मारहाण करण्याची धमकी दिल्याबद्दल केव्हिन पीटरसनला ट्विटरवरून निलंबित केले गेले. हा एक विनोदी विषय होता. कृपया त्याचे ट्विटर अकाऊंट सुरू करा", असे मॉर्गनने ट्विटरवर म्हटले. मॉर्गन यांनी ट्विटबरोबरच एक स्क्रीनशॉटही पोस्ट केला आहे.
याप्रकरणी ट्विटर म्हणाले, "कृपया हे जाणून घ्या की नियमांचे वारंवार उल्लंघन केल्यामुळे आपले खाते कायमचे निलंबित केले जाऊ शकते. आपल्या खात्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी ट्विटर प्रक्रियेचे अनुसरण करा."
"पियर्स मॉर्गन, मी तुला जेव्हा बघेन तेव्हा कानाखाली मारेन. हे मूर्खपणाचे ठरणार नाही", असे पीटरसनने म्हटले होते. पीटरसनने 2014 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. त्याने इंग्लंडकडून 104 कसोटी सामन्यात प्रतिनिधीत्व केले. त्यात त्याने 8 हजार 181 धावा केल्या. तर 136 एकदिवसीय सामन्यात त्याच्या नावावर 4 हजार 440 धावा आहेत. 37 टी-20 सामन्यात त्याने1 हजार 167 धावा केल्या. पीटरसनने आयपीएलमध्ये 36 सामने खेळून 1 हजार एक धावा केल्या. ज्यात 1 शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे.