लंडन - इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसनने भारताचा युवा डावखुरा फलंदाज ऋषभ पंतबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. 'पंतला प्रौढ होण्यासाठी वेळ लागेल आणि त्याची क्षमता समजण्यास अजून काही वर्षे लागतील. तो आयपीएल आणि भारतीय संघाकडून खेळतो त्यामुळे तो आपले स्वप्न जगतोय', असे पीटरसनने म्हटले आहे.
हेही वाचा -रशियाला 'वाडा'चा दणका, ऑलिम्पिकसह फुटबॉल विश्वकरंडकातून पत्ता कट
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान पीटरसनने आपले मत मांडले. पीटरसन पुढे म्हणाला, 'पंत तरुण आहे आणि त्याच्याकडे उर्जादेखील आहे. यावेळी त्याला अनेक प्रकारच्या टीकेचा सामना करावा लागेल. तो सध्या २१ वर्षांचा आहे. मी त्याला आयपीएलमध्ये खेळताना पाहिले आहे, तो एकच चूक पुन्हा पुन्हा करतो. जेव्हा आपण चुका करतो तेव्हा क्रीडातज्ञ आपल्यावर टीका करतात कारण आपण चुकांपासून शिकले पाहिजे. तो २१ वर्षाचा आहे हे मला माहित नव्हते. मला वाटलं तो २४-२५ वर्षाचा आहे. या वयात आपली बुद्धिमत्ता वाढते आणि परिपक्वता देखील येते.'
सध्या भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका सुरु आहे. पहिला सामना भारताने तर, दुसरा सामना विंडीजने जिंकला असून शेवटचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. तिरूवनंतरपुरम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-३० सामन्यात पंतने ३ चौकार आणि एका षटकारासह ३३ धावा केल्या होत्या. विंडीजने या सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला आहे.