नवी दिल्ली -माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने भारतीय क्रिकेटमध्ये उच्च स्तरावरील घराणेशाहीला नकार दिला आहे. मात्र, स्थानिक क्रिकेटमध्ये हा प्रकार होत असल्याचे त्याने सांगितले. आकाशने आपल्या यूट्यूब वाहिनीवर प्रतिक्रिया दिली.
आकाश म्हणाला, "मी हा प्रकार राज्यांच्या संघामध्ये पाहिला आहे. जेथे एक खेळाडू बर्याच काळापासून कर्णधार होता. तो प्रशासकाचा मुलगा होता. त्याचा खेळही चांगला नव्हता आणि त्याची आकडेवारी देखील ही गोष्ट स्पष्ट करते. परंतु उच्च पातळीवर असे कधीच घडत नाही. कोणीही कोणालाही आयपीएल करार असाच देत नाही."
आकाशने यावेळी रोहन गावस्कर आणि अर्जुन तेंडुलकरचे उदाहरण दिले. रोहन हा दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांचा आणि अर्जुन हा सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे.
आकाश म्हणाला, "रोहन हा सुनील गावस्कर यांचा मुलगा असल्याने त्याने अधिक क्रिकेट, अधिक एकदिवसीय आणि कसोटी सामने खेळायला हवे होते, पण तसे झाले नाही. बंगालसाठी सातत्याने चांगली कामगिरी करत असल्याने तो तो भारताकडून खेळला. तो काही काळ मुंबईच्या रणजी संघातही नव्हता. त्याचे आडनाव गावस्कर असूनही त्याला मुंबईच्या संघात स्थान मिळत नव्हते." रोहनने भारताकडून 11 एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याने 151 धावा केल्या.
"अर्जुनबद्दल आपण असेच म्हणू शकता कारण तो सचिनचा मुलगा आहे. त्याला प्लेटमध्ये काहीही दिलेले नाही. तो भारतीय संघात सहज पोहोचला नाही. अंडर-19 मध्ये कोणालाही निवडत नाही. जेव्हा चांगली कामगिरी केली जाते तेव्हाच ही निवड होते'', असेही आकाशने सांगितले.