मुंबई - नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीवरून सुरू असलेला वाद अद्याप शमलेला नाही. आता या वादात भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी उडी घेतली आहे. त्यांनी खेळपट्टीबाबत टीका करत अशा प्रकारच्या खेळपट्टी कसोटी क्रिकेटसाठी खराब असल्याचे म्हटलं आहे.
एका इंग्रजी माध्यमाशी बोलताना वेंगसकर म्हणाले, 'भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेत. जेव्हा तुम्ही जो रुट सारख्या महान फलंदाजाला महान गोलंदाज होताना पाहता, तेव्हा साहजिकच असे वाटतं की, खेळपट्टीमध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे.'
जो रुटने भारताविरुद्धच्या अहमदाबाद कसोटीत ८ धावा देत ५ विकेट घेतल्या. तसेच या सामन्यातील ३० पैकी २७ विकेट या फिरकीपटूंनी घेतल्या. हा सामना दोन दिवसात संपला. यात भारताने १० विकेटनी विजय मिळवला. पुढे बोलताना वेंगसकर यांनी इंग्लंडच्या बचावात्मक रणणितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. इंग्लंडचा संघ या सामन्यात पहिल्या डावात ११२ वर तर दुसऱ्या डावात ८१ धावांत ऑलआऊट झाला.