ढाका -बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मशरफी मुर्तझाला कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. मुर्तझाने शुक्रवारी चाचणीसाठी आपला नमुना दिला होता. या चाचणीमध्ये तो पॉझिटिव्ह आढळला. ढाका येथील राहत्या घरी त्याने स्वत:ला क्वारंटाईन केले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, "गुरुवारी रात्री मुर्तझाला ताप आला होता. शुक्रवारी कोरोना चाचणीसाठी त्याचा नमुना घेण्यात आला. आणि आज (शनिवारी) तो पॉझिटिव्ह आढळला. त्याची प्रकृती स्थिर असून त्याचे कुटुंबही ठीक आहे."
फेब्रुवारीमध्ये घरच्या मैदानावर झिम्बाब्वेविरुद्धच्या झालेल्या मालिकेसाठी मुर्तझाने अखेरचे नेतृत्त्व केले होते. त्याच्या निवृत्तीविषयी खूप चर्चा रंगल्या आहेत. त्याने यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
नफीस इक्बालला कोरोनाची लागण -
बांगलादेशच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार तमीम इक्बालचा भाऊ नफीस इक्बाल याला कोरोनाची लागण झाली आहे. एका अहवालानुसार, माजी सलामीवीर फलंदाज असलेल्या नफीसने याची खातरजमा केली. सध्या तो चटगांवमधील त्याच्या घरी क्वारंटाईन आहे.