चंदीगड - आंतरराष्ट्रीय टेनिस मॅच फिक्सिंग प्रकरणातील आरोपी रवींदर दांडीवाल याला सोमवारी पंजाब पोलिसांनी मोहाली येथून अटक केली. दांडीवालने नुकताच चंदीगडमध्ये श्रीलंका टी-20 लीगचा अनधिकृत सामना आयोजित केला होता.
अटक केल्यानंतर दांडीवालला न्यायालयात हजर केले. त्यानंतर त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. बीसीआयच्या रडारवर असलेल्या दांडीवालने नुकताच 29 जून रोजी युवा टी-20 लीग सामना आयोजित केला होता. हा सामना यू-ट्यूबवर दाखवला गेला.
बीसीसीआय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा (एसीयू) गट मोहालीला जाणार असून पोलिसांना ते दांडीवाल संबधित माहिती देणार आहेत. बीसीसीआयच्या एसीयूचे अध्यक्ष अजित सिंह यांनी सांगितले, "हो, दांडीवालला अटक करण्यात आली आहे. आम्ही त्याच्याकडून जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू. आम्ही आमच्याकडे असलेली माहितीही पोलिसांना सांगू."