मेलबर्न - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना २६ डिसेंबरपासून खेळला जाणार आहे. पहिला सामना ८ गडी राखून जिंकल्याने, यजमान ऑस्ट्रेलिया संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. तर दुसरीकडे विराट कोहली आणि मोहम्मद शमी शिवाय भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलियात भारताचा हा ५० वा कसोटी सामना आहे. या सामन्यात ५ मोठे रेकॉर्ड पाहायला मिळू शकतात. जाणून घ्या कोणते आहेत ते रेकॉर्ड....
- चेतेश्वर पुजाराला कसोटी क्रिकेटमध्ये ६ हजार धावा पूर्ण करण्यासाठी ११७ धावांची गरज आहे. मेलबर्न कसोटी तो ६ हजार धावांचा टप्पा ओलांडू शकतो. जर त्याने ६ हजार धावा केल्या तर तो अशी कामगिरी करणारा भारताचा ११ वा फलंदाज ठरेल. पुजाराने आतापर्यंत ७८ कसोटी सामन्यातील १३० डावात खेळताना ५ हजार ८८३ धावा केल्या आहेत.
- उमेश यादवने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यत १४७ विकेट घेतले आहेत. त्याला १५० विकेटचा टप्पा गाठण्यासाठी ३ विकेटची गरज आहे. त्याने ३ विकेट घेत १५० च्या टप्पा केल्यास तो अशी कामगिरी करणारा भारताचा १७ वा गोलंदाज ठरेल.
- नॅथन लिओनला कसोटी क्रिकेटमध्ये ४०० विकेट पूर्ण करण्यासाठी ९ विकेटची गरज आहे. त्याने जर ९ विकेट घेत ४०० चा टप्पा पार केला तर तो अशी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलियाचा तिसरा गोलंदाज ठरेल. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक विकेट शेन वॉर्नने घेतल्या आहेत. वॉर्नच्या नावे ७०८ विकेट आहे. वॉर्ननंतर ग्लेन मॅग्राथचा नंबर लागतो. त्याच्या नावावर ५६३ विकेट आहेत.
- मेलबर्न कसोटी सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघातील १०० वा कसोटी सामना आहे. भारताविरुद्ध १०० कसोटी सामने खेळणाऱ्या संघाच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा संघ दुसरा ठरला आहे. भारताने इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक १२२ कसोटी सामने खेळली आहेत.