नवी दिल्ली - फिटनेस इंडिया मुव्हमेंटच्या पहिल्या वर्धापनानिमित्त आज (गुरूवार ) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील विविध क्षेत्रातील काही निवडक व्यक्तींशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. या चर्चासत्रात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, दोन वेळचा पॅरालिम्पिकमधील विजेता देवेंद्र झाझरिया सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी विराटशी बोलताना त्याच्या कर्तृत्वाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
विराटचे कौतुक करताना मोदी म्हणाले, तुझे नाव आणि काम दोन्ही विराट आहेत. त्यानंतर मोदींशी संवाद साधताना विराट कोहली म्हणाला की, आम्ही ज्या काळात खेळायला सुरुवात केली त्या काळात खेळाची आवश्यकता बदलली होती. आपल्याकडील व्यवस्था खेळासाठी योग्य नव्हती आणि खेळासाठी मला खूप काही बदलावे लागले.
याशिवाय मोदींनी विराटला योयो टेस्ट संदर्भात विचारणा केली. टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंचे योयो टेस्ट होत आहे. यात कर्णधारालाही योयो टेस्ट द्यावी लागते का? असा प्रश्न मोदींनी विचारला. मोदीच्या या प्रश्नाला विराटने आम्ही फिटनेस लेव्हल वाढवत आहोत. यात योयो टेस्ट अंत्यत गरजेची आहे. जर खेळाडू या टेस्टमध्ये फेल झाला तर त्याला संघात स्थान मिळणार नाही, असे उत्तर दिले.