नवी दिल्ली -भारतात 'मी-टू'चं वादळ अजून शमलेलं नाही. महिलांवरच्या लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आपल्याला ऐकायला मिळतात. हैदराबादमधील दिशाच्या घटनेनंतर या प्रकारांना विराम मिळेल असे वाटत असताना, लैंगिक अत्याचाराचे एक नवीन प्रकरण समोर आले आहे.
हेही वाचा -रणजी ट्रॉफी : डाव फसला!..महाराष्ट्र संघ अवघ्या ४४ धावांवर गारद
दिल्ली येथील नैनु शर्मा नावाच्या एका महिला क्रिकेटपटूने भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरकडे ट्विटरद्वारे मदतीची मागणी केली आहे. या महिला क्रिकेटरने कोच बलात्काराचा प्रयत्न करीत असल्याचा धक्कादायक खुलासा ट्विटरद्वारे केला आहे. तिच्या या ट्विटमुळे समाजमाध्यमांत चर्चा सुरू झाली असून 'मी-टू इंडिया'च्या अधिकृत ट्विटर अकांऊटनेही या प्रकरणी तिला मदतीचे आश्वासन दिले आहे.
'मी दिल्लीतील एक महिला क्रिकेटपटू आहे. माझा प्रशिक्षक माझा विनयभंग आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न करतो. मी त्याला विरोध केला असता तो मला माझे करिअर संपवण्याची धमकी देतो. या प्रशिक्षकाची आणि निवड समितीतील लोकांची जवळीक आहे. असे असताना मी माझ्या करिअरमध्ये पुढे जाऊ शकत नाही. कृपया मला मदत करा', असे या क्रिकेटपटूने गंभीरला टॅग करत म्हटले आहे.
या क्रिकेटपटूने ट्विटमध्ये प्रशिक्षकाच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे गौतम गंभीर या प्रकरणी कोणती पाऊले उचलतो, हे पाहणे महत्वाचे ठरेल.