कराची- श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा करण्यात आली असून फवाद आलमची तब्बल दहा वर्षानंतर संघात वापसी झाली आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका संघात २ सामन्याची कसोटी मालिका पाकिस्तानमध्ये खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी आलमची निवड संभाव्य संघात करण्यात आली आहे.
फवाद आलमने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना २००९ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता. त्यानंतर तब्बल दहा वर्षांनंतर तो संघात पुनरागमन करणार आहे. प्रथम श्रेणीमध्ये आलमची कामगिरी पाहून निवड समितीने त्याला संधी दिली आहे.
पाकच्या निवड समितीने अष्टपैलू खेळाडू इफ्तिकार अहमद आणि मूसा खान यांना संघात जागा दिलेली नाही. दोघेही ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संघात होते. मात्र, त्यांना या दौऱ्यात अपेक्षित कामगिरी करता आलेली नव्हती. महत्वाचे म्हणजे, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेला युवा गोलंदाज नसीम शाहला मात्र, संधी मिळाली आहे.
पाकिस्तान आणि श्रीलंका संघात पहिला कसोटी सामना ११ डिसेंबरला रावलपिंडीच्या मैदानात रंगणार आहे. तर कराचीच्या मैदानात दुसरा सामन्याला १९ डिसेंबर पासून सुरूवात होणार आहे.
असा आहे पाकिस्तानचा संघ -
अजहर अली (कर्णधार), आबिद अली, अशद शफीक, बाबर आझम, फवाद आलम, हारिस सोहैल, इमाम उल-हक, इमरान खान, कासिफ भाटी, मोहम्मद अब्बास, मोहम्मद रिजवान, शाहीन शाह अफरीदी, शान मसूद, यासिर शाह आणि उस्मान शिनवारी.