हैदराबाद -विराट कोहली आणि अनुष्का शर्मावर टिप्पणी केल्याने सुनील गावसकर सध्या वादत सापडले आहेत. सोशल मीडियावर त्यांना टीकेलाही सामोरे जावे लागले. मात्र, माजी क्रिकेटपटू आणि यष्टीरक्षक फारूक इंजिनियर यांनी सुनील गावसकर यांना पाठिंबा दिला आहे.
'सुनीलने विराट आणि अनुष्काबद्दल जे म्हटले आहे, ते टीका करण्यासाठी नव्हे तर केवळ विनोद म्हणून म्हटले होते. त्यामागे वाईट हेतू नव्हता. मात्र, विनोद समजून घेण्याबाबत भारतीयकच्चे आहेत. त्यामुळेच सुनीलच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला', अशी प्रतिक्रिया फारूक यांनी दिली आहे.
'मी सुनीलला चांगले ओळखतो. तो एखाद्या खेळाडूच्या पत्नीला वाईट हेतूने काही बोलणार नाही. कधी-कधी आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला जातो. २०१९च्या विश्वकरंडकावेळी माझ्याही बाबतीत असे झाले होते', असे फारूक म्हणाले.
काय आहे प्रकरण?
आयपीएलमध्ये पंजाब विरुद्ध बंगळुरू असा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाबने बंगळुरूसमोर प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २०६ धावा केल्या. तर, विराटच्या नेतृत्वातील बंगळुरूचा संघ १७ षटकांत १०९ धावांतच गारद झाला. विराटने शतक झळकावलेल्या पंजाबचा कर्णधार केएल राहुलचे दोन झेल सोडले. तर, फलंदाजीतही विराट एका धावेवर माघारी परतला. या कामगिरीवरून सुनील गावसकर यांनी समालोचन करताना अनुष्काशी संबंध जोडून विराटच्या कामगिरीबाबत वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर ते ट्रोलही झाले. अनुष्कानेही आपली प्रतिक्रिया दिली होती. अनुष्काच्या प्रतिक्रियेनंतर गावसकरांनी आपली बाजू मांडली आहे. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला, असे गावसकरांनी सांगितले.