हैदराबाद -कोरोनाव्हायरस साथीच्या दरम्यान पाकिस्तानचा क्रिकेट संघ इंग्लंडला पोहोचला आहे. पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी आणि टी-20 मालिका खेळायची आहे. 5 ऑगस्टपासून मँचेस्टरमध्ये कसोटी मालिका सुरू होईल. कोरोनामुळे आयसीसीने बरेच नवीन नियम बनवले आहेत.
या कसोटी मालिकेपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) त्यांच्या खेळाडूंचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये हे क्रिकेटपटू बकरी ईद साजरी करताना दिसत आहेत. मात्र, पीसीबीने शेअर केलेल्या या फोटोंमुळे चाहत्यांनी क्रिकेटपटूंना चांगलेच ट्रोल केले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, सध्याच्या कोरोना काळात या क्रिकेटपटूंनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यामुळे आणि मास्क न घातल्यामुळे चाहत्यांनी त्यांना ट्रोल केले आहे. हे क्रिकेटपटू सध्या इंग्लंडमधील जैव सुरक्षित वातावरणात राहत आहेत.
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तीन कसोटी आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. उभय संघातील पहिला कसोटी सामना 5 ते 9 ऑगस्टदरम्यान ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवण्यात येईल. तर, दुसरा कसोटी सामना 13 ते 17 ऑगस्ट आणि तिसरा कसोटी सामना 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान खेळवला जाईल. दुसरा आणि तिसरा कसोटी सामना साऊथम्प्टनच्या एजेस बाउल येथे खेळवला जाईल.
या मालिकेनंतर, दोन्ही संघात टी-20 मालिका पार पडणार आहे. हे तीन सामने 28 ऑगस्ट, 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरदरम्यान खेळवण्यात येतील.