मुंबई- दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने आपल्या कसोटी आणि टी-२० कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने नुकतीच संपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत डु प्लेसिसला वगळून क्विंटन डी कॉककडे संघाचे नेतृत्व दिले होते. दरम्यान डु प्लेसिसनंतर क्विंटन डी-कॉककडे आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व जाण्याची शक्यता आहे.
राजीनाम्याविषयी बोलताना डु प्लेसिस म्हणाला, 'नवोदीत खेळाडूंना योग्य संधी मिळावी यासाठी आपण कर्णधार पदावरुन पायउतार होत आहे. मी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणार असून जर डी कॉकला संघाचे नेतृत्व मिळाल्यास त्याला मदत करण्यासाठी मी नेहमी हजर आहे.'
तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व करण्याचे भाग्य मला मिळाले. या प्रवासात आनंदाचे क्षणासह खडतर क्षणही अनुभवाला मिळाले. खेळाडू म्हणून हा अनुभव नेहमी चांगलाच राहिलेला आहे. पायउतार होणं हा सर्वात कठिण निर्णय होता, असेही डु-प्लेसिस म्हणाला.
डु-प्लेसिसने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मध्ये एकूण ११२ आंतरराष्ट्रीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व केले आहे. यात त्याने आफ्रिकेला ६९ सामन्यात विजय मिळवून दिला आहे. दरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नेतृत्वात खेळताना आफ्रिकेला मागील ८ सामन्यांपैकी ७ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. यानंतर डु-प्लेसिस टीकेचा धनी ठरला होता.