नवी दिल्ली - क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेला दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज एबी डिव्हीलियर्स पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना पाहायला मिळू शकतो. याचे संकेत आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसीसने दिले आहेत. डिव्हीलियर्सने २०१७ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली होती.
याबाबत फाफ डू प्लेसीसने सांगितलं की, ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या आगामी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी डिव्हीलियर्सला संघात आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. फाफ डू प्लेसीसच्या पूर्वी संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी डिव्हीलियर्सचे संघात स्वागत करायला आवडेल असे सांगत त्यांनी डिव्हीलियर्ससोबत मागील ३ ते ४ महिन्यांपासून बोलणी सुरू असल्याचे सांगितले आहे.
निवृत्ती जाहीर केल्यानंतर डिव्हीलियर्स सध्या वेगवेगळ्या लीग स्पर्धामध्ये खेळत आहे. त्याने २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर अचानक क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, फाफ डू प्लेसीस आणि मार्क बाऊचर यांच्या वक्तव्यावरुन डिव्हीलियर्स पुन्हा मैदानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना पाहायला मिळू शकतो.