जोहान्सबर्ग - कोरोना व्हायरसचे कारण पुढे करत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी दक्षिण आफ्रिकेचा दौरा रद्द केला. यानंतर दक्षिण आफ्रिका संघाचा माजी कर्णधार आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचा पदाधिकारी ग्रीम स्मिथ याने, ऑस्ट्रेलिया बोर्डाचा हा निर्णय अत्यंत निराशाजनक असून यात आफ्रिका बोर्डाचे मोठे आर्थिक नुकसान होईल, असे सांगितले.
ऑस्ट्रेलियाचा संघ या महिन्याच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार होता. या दौऱ्यात उभय संघामध्ये तीन सामन्याची कसोटी मालिका खेळवण्यात येणार होती. पण ऐनवेळी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कोरोना व्हायरसचे कारण सांगत, आम्ही हा दौरा करणार नसल्याचे आफ्रिका बोर्डाला कळवले.
ऑस्ट्रेलिया बोर्डाच्या या निर्णयावर ग्रीम स्मिथ याने सांगितलं की, 'ऑस्ट्रेलिया बोर्डाने घेतलेला निर्णयावर आम्ही निराश आहोत. आम्ही या दौऱ्यासाठी संपूर्ण तयारी केली होती. यात ऑस्ट्रेलिया बोर्डाकडून असलेल्या आपेक्षा आम्ही पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील होतो. अखेरच्या क्षणी ऑस्ट्रेलिया बोर्डाने दौरा रद्द केल्याचे कळवले. यात आफ्रिका बोर्डाचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.'