लंडन- आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेमध्ये भारताने श्रीलंकेचा एकतर्फी पराभव केला. हा विजय अपेक्षितच होता. कारण स्पर्धेत श्रीलंकेचे प्रदर्शन म्हणावे तसे उल्लेखनीय ठरलेले नव्हते. श्रीलंकेने इंग्लडचा संघ सोडून इतर दुबळ्या संघाबरोबर सामने जिंकले होते. त्यात अफगाणिस्तान, वेस्ट इंडिजचा समावेश होतो. श्रीलंकेने या संपूर्ण स्पर्धेत 300 हून अधिक धावा फक्त एकाच सामन्यात केल्या आहेत. मात्र, तसे पाहायला गेल्यास लंकेचा संघ अनलकी ठरला आहे, कारण त्यांचे दोन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत.
दरम्यान, श्रीलंकेविरुध्दचा सामना भारतासाठी महत्त्वपूर्ण होता असे म्हणता येणार नाही. कारण भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचलेलाच होता. गुणातालिकेत अव्वल क्रमांक पटकावण्यासाठी हा सामना जिंकणे महत्त्वाचे होते इतकेच. मात्र, या सामन्यात आश्चर्याचा धक्का होता तो म्हणजे, भारतीय संघ या सामन्यात दोन बदलासह उतरला. या सामन्यात कर्णधार कोहली युजवेंद्र चहलच्या ठिकाणी कुलदीप यादव आणि मोहम्मद शमीच्या ठिकाणी रविंद्र जडेजाला सोबत घेऊन मैदानात उतरला. कारण भारतीय संघ विजयी रुळावर असताना, कर्णधार कोहली आणि संघ व्यवस्थापकांनी अचानक लंकेविरुध्दच्या सामन्यात दोन बदल केले.