अहमदाबाद - भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये २४ फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे. हा सामना दिवस-रात्र पद्धतीने खेळला जाणार असून मोटेरा मैदानाच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना मदत मिळेल, अशी आशा भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने व्यक्त केली आहे. तो रविवारी पत्रकारांशी बोलत होता.
रोहित शर्मा म्हणाला, 'मला मोटेरा आणि चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी सारखी वाटत आहे. चेन्नईप्रमाणेच मोटेरामध्ये देखील चेंडू टर्न होईल. आम्ही त्या नुसारच तयारी करत आहोत.'
मोटेराच्या सरदार पटेल स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले आहे. यात मैदानाची प्रेक्षक क्षमता वाढवण्यासह अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. हे मैदान जगातील सर्वात मोठ्या प्रेक्षक क्षमतेचे मैदान असून या मैदानावर १ लाख १० हजार प्रेक्षक सामन्याचा आनंद घेऊ शकतात.