मुंबई- कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर पाऊल उचलत राज्यात सर्वत्र ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आल्याची घोषणा केली. संचारबंदीदरम्यान रस्त्यावर ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या संचारबंदीचे स्वागत भारताचा माजी सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्राने केले आहे.
आकाश चोप्राने एक ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. आकाश आपल्या ट्विटमध्ये म्हणतो की, 'हा खरोखर चांगला निर्णय आहे. जर लोकं सांगूनही ऐकत नसतील तर त्यांना कोणतेही पर्याय देण्याची काहीही गरज नाही. त्यामुळे आता सर्वांनी घरातच राहा.'
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत लोकांनी रविवारी जनता कर्फ्यूला मोठा प्रतिसाद दिला. मात्र सायंकाळी ५ वाजता जमावबंदीचे नियम मोडत, लोकांनी रस्त्यावर विनाकारण गर्दी केली. ही बाब निदर्शनास आल्याने, संचारबंदीचा कठोर निर्णय घ्यावा लागत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी या निर्णयासह राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा सील करण्याचे आदेशही दिले आहेत. संचारबंदीदरम्यान रस्त्यावर ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.