नवी दिल्ली- युवराज 'फायटर' सिंग, होय जर युवीला फायटर म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण युवराजने क्रिकेटचे मैदान तर गाजवलंच पण त्याबरोबर त्यानं कर्करोगावर यशस्वी मात करत आयुष्याची लढाई जिंकली. आज युवराजचा ३८ वा वाढदिवस. १२ डिसेंबर १९८१ साली चंदीगढमध्ये युवराजचा जन्म झाला. टी-२० क्रिकेटमध्ये सहा चेंडूत सहा षटकार ठोकण्याचा विक्रम युवीच्या नावे आहे. युवीने टी-२० क्रिकेटमध्ये तर आपली छाप सोडलीच पण त्याआधी त्याने एकदिवसीय सामन्यात अनेक अविस्मरणीय खेळी केल्या. वाचा कोणत्या आहेत युवराजच्या टॉप ५ खेळी...
२००० सालची आयसीसी नॉकआउट ट्रॉफी -
युवराजचे वय १८ वर्षे, त्यानं नुकतंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकलं होतं. ग्लेन मॅग्रथचा सामना करत त्यानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात ८४ धावांची दणकेबाज खेळी केली. युवीच्या याच खेळीच्या जोरावर भारतीय संघाने २६५ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियासमोर ठेवले. युवीने याच सामन्यात शानदार क्षेत्ररक्षणाचा नजराणा पेश करत इयान हार्वेचा झेल घेतला आणि एका फलंदाजाला धावबाद केले. दरम्यान, भारतीय संघाला या सामन्यात पराभव पत्कारावा लागला पण युवीच्या रुपाने भारतीय संघाला एक आक्रमक खेळाडू मिळाला.
२००२ सालची नॅटवेस्ट ट्रॉफी (अंतिम सामना) -
इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय संघासमोर ३२५ धावांचा डोंगर उभारला. तेव्हा भारतीय संघाचे दिग्गज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. भारतीय संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावं लागणार असे वाटत असताना, मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग यांनी भारताला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला. युवराजने या सामन्यात ६९ धावांची खेळी केली. त्याने कैफसोबत १२१ धावांची भागीदारी करत विजयाचा पाया रचला. याच जोरावर भारताने हा सामना जिंकला आणि सौरव गांगुलीने विजयानंतर टी शर्ट काढून 'डान्स' केला होता.