लंडन -इंग्लंडचा लेगस्पिनर मॅट पार्किन्सन आयर्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. पार्किन्सनला दुखापत झाली असल्याने तो या मालिकेत खेळू शकणार नाही.
"पार्की तू लवकर बरा हो. दुखापतीमुळे आयर्लंडविरूद्ध खेळवण्यात येणाऱ्या रॉयल लंडन मालिकेतून तो बाहेर पडला आहे'', असे इंग्लंड क्रिकेटने ट्विट केले.
एका वृत्तानुसार, 23 वर्षीय पार्किन्सनला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. या मालिकेसाठी निवडलेले खेळाडू आधीच जैव-सुरक्षित वातावरणात आहेत. त्यामुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड पार्किन्सनच्या पर्यायी खेळाडूची घोषणा करते, का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
पार्किन्सनने यंदा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. मात्र, त्याला दोन्ही सामन्यांमध्ये विकेट घेता आलेली नाही. त्याने इंग्लंडकडून दोन टी-20 सामने देखील खेळले आहेत. 2019 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने पाच विकेट्स घेतल्या होत्या.