लंडन - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत इंग्लंडने दमदार कामगिरी करत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. इंग्लंडच्या या यशात महत्वाचा वाटा ठरला सलामीवीर जोस बटलरचा. पण तो आता तिसरा आणि अखेरचा टी-२० सामना खेळणार नाही. कारण, त्याने बायो सिक्योर बबलच्या नियमाचे उल्लंघन केले आहे. यामुळे त्याला सामना खेळता येणार नाही.
इंग्लंड बोर्डाकडून सांगण्यात आले की, बटलरने त्याच्या परिवाराला भेटण्यासाठी बायो सिक्योर बबलचे नियम मोडले. यामुळे तो अखेरच्या सामन्यासाठी संघात नसणार आहे. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तो इंग्लंड संघासाठी उपलब्ध असणार आहे.
दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खेळाडूंना बायो सिक्योर बबलमध्ये ठेवण्यात येत आहे. यात खेळाडूंना बाहेर फिरता येणार नाही तसेच कोणत्याही व्यक्तीला भेटता येणार नाही, अशा अनेक नियमाचे पालन करावे लागत आहेत.