लंडन - इंग्लंडला तीन वेळा विश्वकरंडक जिंकून देणारी दिग्गज महिला अष्टपैलू खेळाडू जेनी गूनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती घोषित केली. जेनी मागील काही महिन्यांपासून दुखापतीने त्रस्त होती. त्यामुळे तिने अखेर मंगळवारी निवृत्तीचा निर्णय घेतला.
महिला क्रिकेट इतिहासात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत जेनी इंग्लंडची दुसरी खेळाडू आहे. तिने आपल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत २५९ आंतरराष्ट्रीय सामने खेळली आहेत. खास बाब म्हणजे, इंग्लंड महिला संघाने जिंकलेल्या तीन विश्वकरंडक स्पर्धेच्या संघात जेनी सदस्य राहिली आहे. इंग्लंडने २००९ मध्ये दोन (एकदिवसीय आणि टी-२० ) आणि २०१७ मध्ये एक (एकदिवसीय) विश्वकरंडक जिंकला आहे.
उजव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या जेनी गूनने २००४ मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना दक्षिण आफ्रिकेविरुध्द खेळला. महत्वाचे म्हणजे, हा सामना इंग्लंड महिला संघाचा पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना होता. जेनीने १०० टी-२० सामने खेळणारी पहिली महिला क्रिकेटर आहे. असा कारनामा कोणत्याही पुरूष किंवा महिला खेळाडूला करता आलेला नाही.