साऊथम्प्टन - पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील एजेस बाऊल मैदानावरील तिसरी कसोटी बरोबरीत सुटली आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या इंग्लंडवर पावसाने अवकृपा केली. सामन्याच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी पावसाने आपले वर्चस्व कायम राखले. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० असा विजय नोंदवला आहे. इंग्लंडकडून पहिल्या डावात द्विशतकी खेळी करणाऱ्या जॅक क्रॉलेला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. इंग्लंडने दहा वर्षात प्रथमच पाकिस्तानविरूद्धची कसोटी मालिका जिंकली आहे.
फॉलोऑन घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानने दुसऱ्या डावात ४ बाद १८७ धावांपर्यत मजल मारली होती. अखेरच्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे पहिली दोन सत्र वाया गेली. बाबर आझम ६३ तर फवाद आलम शून्यावर खेळत होते. तर, जेम्स अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये ६०० बळींचा टप्पा ओलांडला. या डावात अँडरसनने २ तर स्टुअर्ट ब्रॉड आणि जो रूटने प्रत्येकी एक बळी बाद केला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ८ बाद ५८३ धावा केल्या. या डावात इंग्लंडकडून जॅक क्रॉलेने २६७ तर, जोस बटलरने १५२ धावांची दमदार खेळी केली. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात २७३ धावा करू शकला. या डावात अझर अलीने २१ चौकारांच्या मदतीने २७२ चेंडूत नाबाद १४१ धावा फटकावल्या. याशिवाय त्याने सहाव्या विकेटसाठी मोहम्मद रिझवानसोबत (५३) १३८ धावांची भागीदारी रचली. तर, इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने ५६ धावा देऊन ५ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक -