हेडिंग्ले - पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने ५४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने ५ सामन्यांची वनडे मालिका ४-० ने आपल्या नावावर करत पाकिस्तानचा सुफडा साफ केला. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.
वनडे मालिका ४-० ने जिंकत इंग्लंडकडून पाकिस्तानचा सुफडा साफ
इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने एकट्याने ५ विकेट घेत पाकच्या फलंदाजीचे कंबरडे मोडून काढले
मालिकेतील अखेरच्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना पाकसमोर ३५२ धावांचे आव्हान ठेवले होते. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्या ६ धावांमध्येच पाकचे २ गडी माघारी परतले. मात्र, त्यानंतर बाबर आझमच्या ८० तर कर्णधार सर्फराज अहमदच्या ९७ धावांच्या जोरावर पाकने ४६.५ षटकामध्ये सर्वबाद २९७ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने एकट्याने ५ विकेट घेत पाकच्या फलंदाजीचे कंबरडे मोडून काढले. त्याच्या या शानदार गोलंदाजीसाठी त्याला सामनाविराचा पुरस्कार देण्यात आला.
इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना जो रुटच्या ८४ तर कर्णधार इयॉन मॉर्गनच्या ७६ धावांच्या जोरावर निर्धारीत ५० षटकांमध्ये ९ गडी गमावत ३५१ धावा केल्या. पाकसाठी शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक ४ तर इमाद वसीमने ३ विकेट पटकावल्या.