ऑकलंड- उत्कंठा, रोमांच, थरार आणि टाय.. असंच काहीसे वर्णन इंग्लंड विरुध्द न्यूझीलंड सामन्याचे करावे लागेल. दोन्ही उभय संघात ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात आली. या मालिकेतील अखेरचा सामना अविश्वमरणीय ठरला. विश्वकरंडक २०१९ चा अंतिम सामन्यात न्यूझीलंडला सुपर ओव्हरमध्ये हरवून इंग्लंडने पहिल्यांदाच विश्वविजेतेपद पटकावले. तसाच विजय इंग्लंडने पुन्हा एकदा साकारत टी-२० मालिका जिंकली.
न्यूझीलंड आणि इंग्लंड संघातील पाचव्या निर्णयाक टी-२० सामन्याला पावसामुळे उशीरा सुरुवात झाली. यामुळे पंचानी हा सामना ११-११ षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेतला.
इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा न्यूझीलंडने मार्टिन गुप्टील (२० चेंडूत ५०), कॉलिन मुनरो (२१ चेंडूत ४६) तसेच टीम सिफर्ट (१६ चेंडूत ३९) यांच्या खेळीने ११ षटकात ५ बाद १४६ धावा केल्या. तेव्हा इंग्लंडनेही जॉनी बेअरस्टोच्या दणकेबाज खेळीने ११ षटकात समान १४६ धावा केल्या.