मँचेस्टर - कोरोना काळानंतर सुरू झालेल्या मालिकांमध्ये विश्वविजेता इंग्लंडचा पहिल्यादा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना ३ गडी राखून जिंकत मालिकेवर २-१ने कब्जा केला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३०३ धावांचे लक्ष्य पूर्ण केले. धडाकेबाज खेळी करणारा ग्लेन मॅक्सवेल सामनावीर आणि मालिकावीर ठरला.
मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर तिसरा आणि निर्णायक सामना झाला. यात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. इंग्लंडची सुरूवात अत्यंत खराब झाली. मिचेल स्टार्कच्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर जेसन रॉय टाटा-बाय-बाय करत माघारी परतला. यानंतर त्याच षटकात ज्यो रुटही पायचित होऊन आल्या पाऊले माघारी परतला. इंग्लंडची अवस्था शून्यावर दोन बाद अशी झाली. तेव्हा जॉनी बेअरस्टो आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांनी १० षटके खेळून काढली. मॉर्गन २३ धावांवर बाद झाला. त्याला झम्पाने स्टार्ककडे झेल देण्यास भाग पाडले.
दुसरीकडून बेअरस्टोने आक्रमक पावित्रा स्वीकारला आणि ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्याने बिलिंग्स सोबत ११४ धावांची भागिदारी केली. या दरम्यान, त्याने आपल्या कारकिर्दीतील १०वे शतक पूर्ण केले. बेअरस्टोने १२ चौकार आणि २ षटकारांसह ११२ धावांची खेळी केली. त्याचा अडथळा पॅट कमिन्सने दूर केला. यानंतर ख्रिस वोक्सने ३९ चेंडूत नाबाद ५३ धावा काढत इंग्लंडला तीनशेचा आकडा पार करुन दिला. इंग्लंडने ५० षटकात ७ बाद ३०२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झॅम्पा आणि मिचेल स्टार्क यांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. तर कमिन्सने एक गडी टिपला.
विजयासाठी ३०३ धावांचे विशाल लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला इंग्लंड गोलंदाजांनी अडचणीत आणले. सलामीवीर कर्णधार अॅरोन फिंच (१२) आणि मार्नस स्टोनिस (४) पॉवर प्लेमध्ये बाद झाले. यानंतर डेव्हिड वॉर्नरही २४ धावांवर बाद झाला आणि पाहता पाहता ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ७३ असताना त्यांचे पाच फलंदाजा माघारी परतले. मिचेल मार्श (२०), भरवशाचा मार्नस लाबुशेन (२) झटपट बाद झाले. यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि अॅलेक्स कॅरीने कडवा प्रतिकार सुरू केला. दोघांनी इंग्लंड गोलंदाजांना दाद लागू दिली नाही. त्यांनी २१२ धावांची भागिदारी केली. यादरम्यान, मॅक्सवेलने दुसरे तर कॅरीने आपल्या करिअरमधील पहिले शतक पूर्ण केले.
मॅक्सवेल-कॅरी विजयासाठी १८ धावा कमी असताना मोक्याच्या क्षणी बाद झाले. आदिल रशिदने मॅक्सवेलला टॉम करेनकडे झेल देण्यास भाग पाडले. मॅक्सवेलने ९० चेंडूत ४ चौकार आणि तब्बल ७ षटकारांसह १०८ धावांची खेळी केली. दुसरीकडे जोफ्रा आर्चरने कॅरीला बाद करत सामन्यात रंगत आणली. कॅरीने ११४ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारासह १०६ धावा काढल्या. एकवेळ ऑस्ट्रेलियाच्या हातून हा सामना जातो की काय, अशी शंका निर्माण झाली. तेव्हा मिचेल स्टार्कने शेवटच्या षटकातील आदिल रशिदच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकत सामना ऑस्ट्रेलियाकडे फिरवला. त्यानंतर त्याने चौकार मारत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. इंग्लंडकडून वोक्स आणि रुट यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने ही मालिका २-१ने जिंकली.