लंडन- ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा टी-२० सामना ६ गडी राखून जिंकत, इंग्लंडने ३ सामन्याच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ७ बाद १५७ धावा केल्या. त्या आव्हानाचा पाठलाग करताना जोस बटलरने सलामीला येत नाबाद ७७ धावा ठोकत संघाला विजय मिळवून दिला. या खेळीमुळे बटलरला सामनावीर घोषित करण्यात आले.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या अंगाशी आला. पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा डेव्हिड वॉर्नर भोपळाही फोडू शकला नाही. त्याला जोफ्रा ऑर्चरने बटलरकडे झेल देण्यास भाग पाडले. यानंतर अॅलेक्स कॅरी (२) आणि स्टिव्ह स्मिथ (१०) स्वस्तात बाद झाले. ऑस्ट्रेलिया अवस्था ५ षटकात ३ बाद ३० अशी झाली. तेव्हा कर्णधार फिंच आणि स्टॉयनिस यांनी डाव सावरला.
फिंचने सर्वाधिक ४० धावा केल्या तर स्टॉयनीस ३५ धावा करून बाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ५ बाद ८९ होती. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल (२६) आणि अॅश्टन अगर (२३) या दोघांनी ऑस्ट्रेलियाला सन्मानजनक धावसंख्या गाठून देण्यास मदत केली. ऑस्ट्रेलियाला २० षटकात १५७ धावांपर्यंत मजल मारता आली. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने २ तर जोफ्रा ऑर्चर, मार्क वूड आणि आदिल रशिद यांनी एक-एक गडी टिपला.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लडची सुरुवात काहीशी अनपेक्षितच झाली. जॉनी बेअरस्टो ९ धावांवर हिट विकेट झाला. त्यानंतर डेव्हिड मलान आणि बटलर यांनी डाव सावरला. या दोघांनी १३ व्या षटकात इंग्लंडला शंभरी पार करून दिली, पण ४२ धावांवर मलान बाद झाला. टॉम बॅन्टन (२) आणि इयॉन मॉर्गन (७) स्वस्तात परतले. पण बटलरने फटकेबाजी सुरुच ठेवली आणि दमदार खेळ केला. ५४ चेंडूत त्याने नाबाद ७७ धावा केल्या. त्यात ८ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. त्याने अॅडम झम्पाला षटकार खेचत संघाला विजय मिळवून दिला.