मँचेस्टर- इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना यजमान संघाने जिंकत मालिकेत १-१ने बरोबरी साधली. इंग्लंडच्या गोलंदाजांनी अचूक टप्यावर गोलंदाजी करत संघाला २४ धावांनी विजय मिळवून दिला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २३२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाचा संघ २०७ धावांवर ऑलआऊट झाला. जोफ्रा आर्चर सामनावीर ठरला.
इंग्लंडच्या २३१ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. जोफ्रा आर्चरने ऑस्ट्रेलियाला सुरुवातीला दोन धक्के दिले. त्याने डावखुरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (६) आणि मार्नस स्टोनिस (९)ला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाची अवस्था २ बाद ३७ अशी केली. यानंतर कर्णधार अरोन फिंच आणि मार्नस लाबुसेन यांनी तिसऱ्या गड्यासाठी शतकी भागिदारी केली. ख्रिस वोक्सने लाबुशेनला (४८) पायचित करत जमलेली जोडी फोडली. यानंतर मिचेर मार्शचा (१) अडथळा ऑर्चरने दूर केला.
मार्श पाठोपाठ सेट फिंच ७३ धावांवर बाद झाला. ख्रिस वोक्सने त्याचा त्रिफाळा उडवला. ऑस्ट्रेलियाचा डावाला यानंतर गळती लागली आणि ऑस्ट्रेलियाचा डाव ४८.४ षटकांत २०७ धावांवर आटोपला. यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरीने ३६ धावा करत थोडापार प्रतिकार केला. पण तो संघाला विजयी करण्यात अपयशी ठरला. जोफ्रा ऑर्चर ख्रिस वोक्स आणि सॅम कुरेन यांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. तर आदिल रशिदने एक गडी टिपला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून कर्णधार इयॉन मार्गनने प्रथम फलंदाजी करणे पसंत केले. त्याचा हा निर्णय फसला. सलामीवीर जोडी बेअरस्टो आणि जेसन रॉय, संघाची धावसंख्या २९ असताना तंबूत परतले. तेव्हा जो रुट (३९) कर्णधार मॉर्गन (४२) यांनी धावा जमवल्या. खालच्या फळीत टॉम करेन (३७) आणि आदिल रशिद (३५) यांनी मोलांच्या धावा जोडल्या. त्यांच्या या धावांच्या जोरावर इंग्लंडला २३१ धावांची मजल मारता आली. अॅडम झम्पाने ३ तर, स्टार्कने २ गडी बाद केले. याशिवाय हेझलवूड, कमिन्स, मिचेल मार्श यांनी १-१ गडी बाद करत त्यांना साथ दिली.