मुंबई -बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत 'नवख्या' भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला २-१ असे लोळवले. आता नवीन वर्षात इंग्लंडचा संघ भारतात दाखल झाला आहे. या दौऱ्यात चाहत्यांना ४ कसोटी, ५ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्याची मेजवानी मिळणार आहे. क्रिकेटचा 'गुरू' असेलेला इंग्लंडचा संघ आत्तापर्यंत १४ वेळा भारतात क्रिकेट खेळण्यासाठी आला आहे. आज आपण याच दौऱ्यांची माहिती घेणार आहोत.
इंग्लंडचा पहिला भारत दौरा (१९३३-३४) :
१९३३-३४मध्ये इंग्लंड क्रिकेट संघाने प्रथमच भारत दौरा केला. डग्लस जॉर्डिन यांच्या नेतृत्वातील इंग्लंडने कसोटी मालिकेत भारताला २-१ असे पराभूत केले होते. सी. के. नायडू हे तत्कालिन भारतीय कसोटी संघाचे कर्णधार होते. इंग्लंडने मुंबईच्या जिमखाना स्टेडियमवर पहिला कसोटी सामना ९ गडी राखून जिंकला, तर कोलकाता येथे खेळलेला दुसरा सामना अनिर्णित राहिला. तिसरा सामना इंग्लंडने चेन्नई येथे तब्बल २०२ धावांनी जिंकला.
इंग्लंडचा दुसरा भारत दौरा (१९५१-५२) :
१९५१-५२मध्ये निगेल हॉवर्ड यांच्या नेतृत्वात इंग्लंडने दुसऱ्यांदा भारत दौरा केला. यावेळी दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली, जी १-१ अशी बरोबरीत सुटली. या मालिकेचे पहिले तीन सामने दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे खेळवण्यात आले होते. यानंतर कानपूर येथे खेळलेला चौथा कसोटी सामना इंग्लंडने ८ गडी राखून जिंकला, तर चेन्नईमध्ये खेळलेला शेवटचा सामना भारतीय संघाने एक डाव आणि आठ धावांनी जिंकला. भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासातही हा पहिला विजय होता. विजय हजारे यांच्या नेतृत्वात टीम इंडियाला हा विजय मिळवता आला होता. इंग्लंडविरुद्ध मालिका अनिर्णित राखण्याची भारताची ही पहिलीच वेळ होती.
इंग्लंडचा तिसरा भारत दौरा (१९६१-६२) :
१९६१-६२मध्ये इंग्लंड संघाने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताला भेट दिली आणि भारताने ही मालिका २-० ने जिंकली. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याची ही भारताची पहिली वेळ होती. यजमान संघाने नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्या नेतृत्वात हा इतिहास रचला होता. टेड डेक्स्टर यांच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघ भारतात आला होता. मुंबई, कानपूर आणि दिल्ली येथे खेळले गेलेले तीन कसोटी सामने बरोबरीत सुटले होते. त्यानंतर भारताने कोलकाता कसोटी १८७ आणि चेन्नई कसोटी १२८ धावांनी जिंकली.
इंग्लंडचा चौथा भारत दौरा (१९६३-६४) :
१९६३-६४मध्ये माइक स्मिथ यांच्या कारकिर्दीत इंग्लंडच्या संघाने पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारताला भेट दिली होती. तर, टीम इंडियाची कमान मन्सूर अली खान पटौदी यांच्या ताब्यात होती. मालिकेत खेळले गेलेले पाचही सामने बरोबरीत सुटले होते. इंग्लंड संघाला विजयाची नोंद करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. मालिका बरोबरीत सोडवल्यानंतर भारतीय संघाचे खूप कौतुक करण्यात आले होते.
इंग्लंडचा पाचवा भारत दौरा (१९७२-७३) :
१९७२-७३मध्ये टोनी लुईस यांच्या नेतृत्वात इंग्लंड संघाने पाच सामन्यांच्या मालिकेसाठी भारताला भेट दिली. भारतीय संघाची कमान अजित वाडेकर यांच्या हाती होती. इंग्लंडने सहा गडी राखून मोठा विजय साकारत मालिकेची दणदणीत सुरुवात केली. मात्र, भारतानेही चोख प्रत्युत्तर करत या पुढचे दोन्ही सामने खिशात टाकले. भारताने प्रथम कोलकाता कसोटी सामना २८ तर चेन्नई कसोटी सामना ४ गडी राखून जिंकला. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ने पुढे होता. तर उर्वरित दोन कसोटी बरोबरीत सुटल्या. लेगस्पिनर भागवत चंद्रशेखर आणि बिशनसिंग बेदी यांनी इंग्लंडच्या फलंदाजांना नामोहरम केले.
इंग्लंडचा सहावा भारत दौरा (१९७६-७७) :
१९७६-७७ हे वर्ष इंग्लंडसाठी खास ठरले. टोनी ग्रेग यांच्या नेतृत्वातील इंग्लंड संघाने पाच सामन्यांच्या मालिकेसाठी भारताला भेट दिली. मालिकेचे तीन सामने जिंकत ग्रेगसेनाने तब्बल ४३ वर्षानंतर भारतात कसोटी मालिकाविजय साकारला. दिल्लीतील कसोटी इंग्लंडने एक डाव आणि २५ धावांनी जिंकली. कोलकात्यातील कसोटी पाहुण्यांनी १० गडी राखून जिंकली. तर चेन्नईतील कसोटीत तब्बल २०० धावांनी इंग्लंडने भारताचा धुव्वा उडवला. या पराभवानंतर बंगळुरूमध्ये भारताने विजयी पुनरागमन केले. भारताने ही कसोटी १४० धावांनी जिंकली. उभय संघातील शेवटची मुंबई कसोटी बरोबरीत सुटली. या मालिकेत बिशनसिंग बेदी यांनी भारताची कमान सांभाळली होती.
इंग्लंडचा सातवा भारत दौरा (१९८१-८२) :
भारत आणि इंग्लंड यांच्यात प्रथमच सहा कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. सुनील गावसकर यांच्या नेतृत्वात ही मालिका भारताने १-० अशी जिंकली. उर्वरित सर्व सामने अनिर्णित सुटले. गावसकर अँड कंपनीने मुंबईच्या वानखेडे मैदानावर इंग्लंडला १३८ धावांनी पराभूत करून एकमेव कसोटी जिंकली. या मालिकेत कर्णधार सुनील गावसकर यांनी टीम इंडियाकडून सर्वाधिक ५०० धावा केल्या. कपिल देव यांनीही अष्टपैलू कामगिरी करत इंग्लंडला त्रास दिला होता. कपिल देव यांनी पाच सामन्यांत एकूण २२ खेळाडूंना पॅव्हेलियनचा मार्ग दाखवला.