लंडन -सध्या सुरू असेलेल्या अॅशेसच्या पाचव्या कसोटीत यजमान इंग्लंडने ३८२ धावांची आघाडी घेतली आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने दुसऱ्या डावात ८ गडी गमावत ३१३ धावा केल्या. मात्र, इंग्लंडचा फलंदाज जो डेन्लीचे शतक अवघ्या ६ धावांनी हुकले.
हेही वाचा -बॅडमिंटन : भारताच्या सौरभची व्हिएतनाम ओपनच्या अंतिम फेरीत धडक
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जोफ्रा आर्चर आणि जॅक लीच खेळत होते. अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने ६७ धावांची खेळी केली. तर, बटलरने ४७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू नाथन लायनने सर्वाधिक तीन गडी बाद केले. पीटर सीडल आणि मिशेल मार्श यांना प्रत्येकी दोन तर, कमिन्सला एक गडी बाद करता आला.
तत्पूर्वी, मालिकेच्या दुसऱ्या दिवशी जोफ्रा आर्चरचा झंझावात पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाला आर्चरने खिंडार पाडले. त्याने ६२ धावांत सहा बळी घेतले. या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कांगारुंनी पहिल्या डावात सर्वबाद २२५ धावा केल्या. मालिकेत भन्नाट फॉर्मात असणाऱ्या स्टीव स्मिथने ८० धावांची झुंजार खेळी करत संघाला सव्वादोनशेचा टप्पा गाठून दिला.
धावफलक :
- इंग्लंड (पहिला डाव) : ८७.१ षटकांत सर्व बाद २९४ धावा.
- ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ६८.५ षटकांत सर्व बाद २२५ धावा.
- इंग्लंड (दुसरा डाव) : ९१ षटकांत ८ बाद ३१३ धावा.