लंडन - इंग्लंडचा संघ श्रीलंका दौरा संपल्यानंतर भारतात दाखल होणार आहे. भारतात आल्यानंतर इंग्लंड खेळाडूंसह त्यांच्या सपोर्ट स्टापला सहा दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. या कारणाने त्यांना पहिल्या कसोटीआधी केवळ तीन दिवस सरावासाठी मिळणार आहेत.
श्रीलंका दौऱ्यातून माघार घेतलेले इंग्लंडचे बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि रोरी बर्न्स हे रविवार रात्री भारतात दाखल झाले आहेत. त्यांना हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. पुढील सहा दिवसांत त्यांची तीन वेळा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. यात त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर, त्यांना सरावाची परवानगी मिळणार आहे. तिघांनाही पाच दिवस सराव करण्यासाठी मिळणार आहेत.
इंग्लंडचा संघ जेव्हा श्रीलंका दौऱ्यासाठी पोहोचला, तेव्हा त्यांना ४८ तासांनंतर सरावाची परवानगी मिळाली होती. अशात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आणि त्याला क्वारंटाइन करण्यात आले होते.