लंडन -सलामीवीर डोम सिब्ले आणि बेन स्टोक्स यांच्या कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसर्या कसोटीच्या पहिल्या दिवशी 3 बाद 207 धावा केल्या. पहिली कसोटी गमावलेल्या इंग्लंडने सुरुवातीला 81 धावांत 3 फलंदाज गमावले होते. मात्र, सिब्ले आणि स्टोक्सने सामन्यावर नियंत्रण मिळवले. सिब्ले 4 चौकारांसह 86 तर, स्टोक्स 4 चौकार आणि एका षटकारासह 59 धावांवर खेळत आहे.
या दोघांमध्ये 126 धावांची भागीदारी झाली आहे. शेवटच्या सत्रात इंग्लंडने कोणतीही विकेट गमावली नाही. दुसऱ्या सत्रात फिरकीपटू रोस्टन चेसने दोन चेंडूंत दोन गडी बाद करत इंग्लंडला मोठा धक्का दिला. सिब्लेला 44 धावांवर असताना जीवदान मिळाले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजने इंग्लंडला फलंदाजीचे आमंत्रण दिले. सलामीवीर रोरी बर्न्स 15 धावा, तर त्यानंतर आलेला क्रॉले शून्यावर माघारी परतला. कर्णधार जो रूट आणि सिब्ले यांनी 52 धावांची भागीदारी केली. पण अल्झारी जोसेफने रुटला 23 धावांवर माघारी धाडले. जोसेफने कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्यांदा रुटची विकेट घेतली आहे. त्याच्या मुलीच्या जन्मामुळे रुट पहिला कसोटी सामना खेळला नव्हता.
जैव सुरक्षित वातावरणाचा प्रोटोकॉल तोडल्यामुळे इंग्लंडचा संघ वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरशिवाय मैदानात उतरला आहे. तो साऊथम्प्टनहून मँचेस्टरला जाताना ब्राइटनमधील त्याच्या घरी गेला होता. जेम्स अँडरसन आणि मार्क वुड यांना विश्रांती देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्स आणि सॅम करन यांना देण्यात आली आहे. पहिल्या कसोटीतील संघ वेस्ट इंडीजने कायम ठेवला आहे.