इस्लामाबाद - इंग्लंड संघ पुढील वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये पाकिस्तानचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात उभय संघामध्ये टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. याबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने माहिती दिली आहे.
इंग्लंड १२ ऑक्टोबरला पाकिस्तानला जाईल. त्यानंतर १४ आणि १५ ऑक्टोबरला दोन टी-२० सामने कराची येथे इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात होतील. ही मालिका झाल्यानंतर लगेचच दोन्ही संघ १६ ऑक्टोबरला टी-२० विश्वकरंडक खेळण्यासाठी भारतात दाखल होणार आहेत.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला जानेवारीच्या महिन्यात एका छोट्या दौऱ्यासाठी आमंत्रण दिले होते. पाकचे हे आमंत्रण इंग्लंडने स्वीकारले आहे. मात्र जानेवारीमध्ये इंग्लंडच्या दुसऱ्या मालिका असल्याने त्यांनी ऑक्टोबरमध्ये हा दौरा करण्याचा निर्णय घेतला. ज्याला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मंजूरी दिली आहे.
याविषयी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी सांगितले की, मला हे सांगण्यास आनंद होत आहे की, इंग्लंडचा संघ ऑक्टोबर महिन्यात टी-२० सामन्याची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा करणार आहे. इंग्लंडचा संघ १६ वर्षानंतर पाकिस्तानचा दौरा करत आहे. या मालिकेच्या माध्यमातून पुढे जाऊन कसोटी मालिकेसाठी देखील प्राधान्य मिळू शकेल.