लंडन - प्रतिष्ठित अॅशेसच्या पाचव्या कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर १३५ धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रुटने प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांची स्तुती केली आहे. रुट म्हणाला, 'आमच्या कोचला विजयी निरोप दिल्यामुळे आम्ही आनंदी आहोत.'
हेही वाचा -बिलियर्ड्स : पंकज अडवाणीने पटकावले २२ वे विश्व विजेतेपद
आपल्या मार्गदर्शनाखाली यंदाचे विश्वकरंडक संघाला पटकावून दिल्यानंतर, ट्रेवर बेलिस यांचा हा शेवटचा सामना होता. त्यामुळे इंग्लंडच्या संघाने त्यांना विजयी निरोप दिला आहे. अॅशेसच्या पाचव्या कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवत मालिका २-२ ने बरोबरीत सोडवली.
रुट म्हणाला, 'प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांनी संघात जीव ओतला. ड्रेसिंग रुममधील त्यांचे योगदान महत्वाचे होते. काही काळानंतर खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यात तुम्हाला चांगले संबंध पाहायला मिळतात. अॅशेसच्या तयारीसाठी मी दीड वर्षापासून उत्सुक होतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वकरंडक उंचावणे अद्भूत होते.'
ओव्हलच्या मैदानात रंगलेला अखेरचा पाचवा कसोटी सामना इंग्लंडने १३५ धावांनी जिंकला. इंग्लंडच्या विजयात चमकला अनुभवी जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड. ब्रॉडच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने हा सामना जिंकला
स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक माऱ्यापुढे स्टीव्ह स्मिथसह ऑस्ट्रेलियाचे प्रमुख फलंदाज हतबल ठरले. त्यामुळे पाचव्या अॅशेस कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवसीच ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला. इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ३९९ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव २६३ धावांत संपुष्टात आला.