लंडन - कोरोनानंतर पहिल्यांदा क्रिकेट खेळायला सुरुवात केलेल्या इंग्लंडने मायदेशात दोन कसोटी मालिका खेळल्या आणि त्या दोनही जिंकल्या. इंग्लंडने पहिल्यांदा वेस्ट इंडीजला २-१ अशा फरकाने पराभूत केले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत १-० असा विजय मिळवला. आता इंग्लंडचा संघ पाकिस्तानविरुद्ध ३ टी-२० सामन्याची मालिका खेळणार आहे. याआधीच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर जेसन रॉयने सरावादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतली आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आज म्हटलं की, जेसन रॉयला ओल्ड ट्रैफर्ड मैदानात सरावादरम्यान, दुखापत झाली. ही बाब तपासणी दरम्यान दिसून आली. यामुळे रॉयने मालिकेतून माघार घेतली आहे. पण रॉय संघासोबतच राहणार आहे.
जेसन रॉयचे लक्ष्य सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेवर असेल. रॉयने मागील ५ टी-२० सामन्यात ४० हून अधिकच्या सरासरीने धावा केल्या आहेत. फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात रॉयने अर्धशतकी खेळी केली होती.