लंडन- इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने ५ गडी राखून विजय मिळवला. इंग्लंडने विजयासाठी दिलेले आव्हान ऑस्ट्रेलियाने ५ गडी आणि ३ चेंडू राखून पूर्ण केले. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने ६ बाद १४५ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने या विजयासह व्हाईटवॉशची नामुष्की टाळली. मिचेल मार्श सामनावीर ठरला. दरम्यान, ऑस्ट्रेलिया आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत अव्वलस्थानी पोहोचली आहे.
इंग्लंडच्या १४६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मॅथ्यू वेड आणि कर्णधार अॅरोन फिंच यांनी ३१ धावांची सलामी दिली. मॅथ्यू वेड मार्क वूडच्या गोलंदाजीवर १४ धावांवर बाद झाला. फिंच आणि स्टॉयनीस या जोडीने डाव सावरला. फिंच ३९ धावांवर तर स्टॉयनीस २६ धावांवर बाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला हा सामनादेखील गमवावा लागणार असे वाटत होते. पण अष्टपैलू मिचेल मार्श संघासाठी धावून आला. त्याने संयमी खेळी करत संघाला विजय मिळवून दिले. मार्शने ३६ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ३९ धावा केल्या. मार्शला अॅश्टन अगरने १६ धावा करत चांगली साथ दिली.