मुंबई - विश्वविजेता इंग्लंडला ऑस्ट्रेलियाने तीन सामन्याच्या मालिकेत २-१ अशी धूळ चारली. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३ गडी राखून विजय मिळवला. ग्लेन मॅक्सवेल आणि अॅलेक्स कॅरी या जोडीने अशक्यप्राय वाटणारा विजय, ऑस्ट्रेलियाला मिळवून दिला. या दोघांनी एक भन्नाट विक्रम नोंदवला आहे. आतापर्यंतच्या एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात असा पराक्रम कोणालाही करता आलेला नाही.
क्रिकेटची सुरूवात झाल्यापासून, आजघडीपर्यंत ४ हजार २६१ एकदिवसीय सामने खेळली गेली आहेत. यात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड या संघांनी चांगली कामगिरी केली आहे. पण नुकताच पार पडलेला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामना ऐतिहासिक ठरला. या सामन्यात इंग्लंडने दिलेले ३०३ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ३ गडी आणि २ चेंडू राखत पूर्ण केले. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने ९० चेंडूत १०८ धावांची तर अॅलेक्स कॅरीने ११४ चेंडूत १०६ धावांची खेळी केली. यात कॅरी सहाव्या तर ग्लेन मॅक्सवेल सातव्या स्थानावर फलंदाजीला आला होता.