सिडनी- भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन झाल्याची वार्ता आली. बायो-बबलच्या नियमांमुळे आणि राष्ट्रीय कर्तव्य असल्याने, सिराजला त्याच्या वडिलांचे अंतिम दर्शन घेता आले नाही. अशा कठिण प्रसंगातून जात असताना सिराज तिसऱ्या कसोटीसामन्याआधी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघाचे राष्ट्रगीत झाल्यानंतर सामन्याला सुरूवात होणार होती. भारताचे राष्ट्रगीत सुरू असताना सिराजच्या डोळे पाणावले. त्याने आपल्या भावनांना अश्रूंवाटे वाट मोकळी करून दिली. या क्षणाचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मोहम्मद सिराजचे वडिल मोहम्मद गौस रिक्षाचालक होते. त्यांना फुफ्पुसाशी संबंधित आजार होता. सिराजची निवड ज्यावेळी भारतीय संघात झाली. तेव्हा त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत गेली. सिराज भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियात दाखल झाला. त्यानंतर काही दिवसानंतर त्याच्या वडिलांचे निधन झाले. सिराजच्या वडिलांची इच्छा होती की, तो भारतीय संघाकडून खेळला पाहिजे. वडिलांच्या मृत्यूनंतर सिराज राष्ट्रीय कर्तव्य आणि वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये थांबला.