नवी दिल्ली - संयुक्त अरब अमिरातमध्ये (युएई) होणाऱ्या यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगसाठी (आयपीएल) 30 ते 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्याची इच्छा असल्याचे अमिरात क्रिकेट बोर्डाचे सचिव मुबाशशिर उस्मानी यांनी सांगितले आहे. 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांना मैदानात स्थान देण्याची परवानगी देण्याचा निर्णय (युएई) सरकारकडून घेण्यात येईल, असे आयपीएल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पीटीआयला सांगितले.
भारत सरकारकडून ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा :
उस्मानी म्हणाले, ''एकदा आम्हाला बीसीसीआयकडून (भारत सरकारच्या मान्यतेबद्दल) पुष्टी मिळाल्यानंतर आम्ही आमच्या सरकारकडे परवानगी मागू. आमच्या लोकांनी या प्रतिष्ठित स्पर्धेचा अनुभव घ्यावा अशी आमची इच्छा आहे, परंतु हा संपूर्णपणे सरकारचा निर्णय असेल. इथल्या बर्याच स्पर्धांमध्ये प्रेक्षकांची संख्या 30 ते 50 टक्क्यांपर्यंत असते, आम्हाला ही संख्या अपेक्षित आहे.
रग्बी स्पर्धा रद्द, पण आयपीएल होईल -
''युएईमध्ये कोरोनाची 6000 हून अधिक प्रकरणे आहेत आणि सध्या हा रोग जवळजवळ नियंत्रणाखाली आहे. नोव्हेंबरमध्ये होणारी 2020 दुबई रग्बी सेवंस स्पर्धा कोरोनामुळे 1970 नंतर प्रथमच रद्द करण्यात आली आहे. आम्ही काही नियम व प्रोटोकॉल पाळत सामान्य जीवन जगत आहोत. आयपीएलमध्ये अजून काही वेळ आहे, आपण निश्चितपणे यापेक्षा चांगल्या स्थितीत असू'', असे उस्मानी म्हणाले आहेत.