नवी दिल्ली - भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी विश्वकरंडक स्पर्धेनंतर मैदानात दिसला नाही. यामुळे अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. धोनी खेळणार की निवृत्ती घेणार याविषयीच्या चर्चांना ऊत आला आहे. मात्र, चेन्नई सुपर किंग्जमधील धोनीच्या एका सहकाऱ्याने, धोनी निवृत्ती घेणार नाही. तो ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धा खेळेल, असा विश्वास बोलून दाखवला.
विश्वकरंडकानंतर धोनीने अद्याप एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. तो अद्याप क्रिकेटपासून लांब आहे. धोनीच्या भविष्यासंदर्भात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह कर्णधार विराट कोहलीने आपले मत मांडले. पण आता धोनीचा आयपीएलमधील सहकारी आणि वेस्ट इंडीज संघाचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने आपले मत व्यक्त केले.
धोनीच्या भविष्याविषयी बोलताना ब्राव्हो म्हणाला, 'मला वाटतं की धोनी पुढील वर्षी होणारी टी-२० विश्वकरंडक स्पर्धा खेळेल. याबाबत मला कोणतीही शंका नाही. धोनीने क्रिकेटच्या बाहेरील गोष्टीचा कधीच स्वत:वर परिणाम होऊ दिला नाही. कोणत्याही परिस्थितीला न घाबरता, स्वत:च्या क्षमतांवर विश्वास ठेवावे, हेच त्याने आम्हाला शिकवले आहे. नक्कीच तो विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाचा सदस्य असणार आहे.'